ज्ञानरचनावाद शिक्षणाचा पाया
I never teach my pupils,I only attempt to provide the conditions in which they can learn.
Albert Einstein
मुले स्वतः च आपल्या ज्ञानाची निर्मिती करीत असतात.मुलांची ज्ञाननिर्मितीची ही नैसर्गिक पद्धती औपचारिक शिक्षणात आणली तर ख-या अर्थाने शिक्षण बालकेंद्री होईल.असे ब्रुनरसारख्या बोधात्मक-मानसशास्त्रज्ञाना वाटले आणि त्यातूनच ज्ञानरचनावादी शिक्षणासंबंधी चर्चा सुरु झाली.ज्ञानसंरचनावाद ज्या कारणांनी विकसित झाला.त्या बालकेंद्री शिक्षणासाठीच सन २००० आणि २००५ साली राष्ट्रीय पातळीवर आणि २०१० साली राज्यपातळीवर शालेय अभ्यासक्रमाचे आराखडे तयार करताना ज्ञानसंरचनावादाचा आधार घेतला गेला.अभ्यासक्रमाचे दोन मुख्य उद्देश असतात-१)पूर्वजांनी निर्माण केलेले ज्ञान आत्मसात करायला विद्यार्थ्यांना मदत करणे,आणि २)विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी पडेल असे ज्ञान,कौशल्य आणि वृत्ती विकसित करायला मदत करणे.
सद्यस्थितीत दुसरे उद्दिष्ट साध्य करणे फार अवघड झालेले आहे.त्याचे कारण ज्ञान झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणात वाढते आहे.या वेगाने वाढणा-या ज्ञानाचा आंतरजालाचा (इंटरनेटचा)सहाय्याने परिचय करून घेणे एकवेळ सोपे जाईल,पण त्याचे प्रमाणही इतके प्रचंड आहे.की ते सारे स्मरणात ठेवणे केवळ अशक्य आहे.त्यासाठी त्याचे वर्गीकरण करून ते संबंधाच्या स्वरुपात साठवून ठेवावे लागणार आहे. संबोधांमधील साम्यभेद समजून घेणे,त्यांचे परस्परसंबंध समजून घेणे,त्यांचे योग्य संदर्भात उपयोजन करणे,त्यांच्या नव्या संबंधांची कल्पना करणे यासारखी बोधात्मक कौशल्ये आत्मसात केली तरच भावी काळात,स्पर्धेच्या युगात आपल्या तरुणांचा निभाव लागणार आहे.
साने गुरुजींनी म्हटले आहे,
हातांनी जे पेरावे,तेच उगवून हाती पडते.
पाप-पुण्य भले बुरे,हातांनी सदैव घडते.
हात म्हणजे हात,त्यांना जातपात नसते.
श्रमणा-या हातांनीच,जीवनाला वैभव चढते. या पंक्तीमधला सूचक इशारा आपणास समजायला हवा.सर्वोत्तम निर्मितीसाठी कौशल्यविकास हा अनुभव समृद्ध हातानीच साधता येतो.महाराष्ट्रात ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण देण्याची सुरुवात सरकारी पातळीवर झाली आहे.ही खरोखरच आनंदाची बाब आहे.रचनावादी पद्धत ही शिकवण्याची नव्हे तर शिकण्याची पद्धती आहे.लहान वयापासून मुलांकडे ती उपजत असते.पंचेंद्रियांच्या माध्यमातून मूल सभोवतालचे अनुभव घेत असते.प्रत्येक गोष्ट त्याला स्वतःला करून बघायची असते.कुटुंबात हा अनुभव प्रत्येकाला येतो.मोठी माणसे मात्र मुलाला या अनुभवापासून परावृत्त करतात.मुलाला मात्र प्रत्येक गोष्ट अनुभवायची असते.हाच दृष्टीकोन शाळेच्या वातावरणात मुलाला येतो.त्यामुळे सर्जक वृत्तीला तो पारखा होतो;म्हणूनच विद्यार्थ्याची उपजत प्रेरणा जागृत ठेवून,शालेय उपक्रमातून त्याला नवीन ज्ञानासाठी प्रवृत्त करणे हि शिक्षकाची जबाबदारी असते.त्यांच्या आकलनक्षमतेनुसार आवड-छंदानुसार,कल्पकतेनुसार शिकण्याची साधनव्यवस्था शाळेने करायला हवी.HEAD,HEALTH,HANDS आणि HEART या चार ‘H’साठी शिक्षण असते व या मुलभूत गोष्टीचा विकास रचनावादाशिवाय शक्य नाही.
विद्यार्थीकेंद्री शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी यात अंतर असता नये. हे लक्षात घेऊन सर्व शिक्षिका मुलांच्या ‘ताई’बनायला हव्यात तर सर्व शिक्षक ‘दादा’.शिक्षणातून कल्पनाशक्ती व सर्जनशीलता बहरली पाहिजे.त्यसाठी ‘ताई’,’दादांनी’ भाषेच्या तासाला भरपूर भाषिक खेळ खेळू द्यावेत.पुस्तकातील कविता शिकवतानाच मुलांना तशी काव्यरचना करण्यासाठी उत्तेजन दिले जावे.प्रत्येक विषय शिकण्यासाठी ज्ञानरचनावाद ,प्रकल्प पद्धत,स्वयंअध्ययन,गटकाम,अन्य विविध उपक्रमातून शिक्षण आदी अनेक पद्धती उपयोगात आणल्या जाव्यात.विशेष म्हणजे वेगवेगळे उपक्रम हे अगदी बालवाडी-पहिलीपासूनच सुरु करावेत.पहिलीत कधी फणस आणला तर फ-फ फणस ‘ताई’सगळ्यांचे ऐकून घेऊन फणस कापतात.त्यावेळेस रंग,स्पर्श,चव यासाठी सर्व ज्ञानेंद्रिये एकत्र काम करतात.त्यामुळे फणस खाऊन होईपर्यंत मुलांनी सर्वार्थाने एक नवीन अनुभव घेतलेला असतो.कार्यानुभवाच्या तासाला पुष्पगुच्छ,राख्या,शुभेच्छा पत्रे,शाडूमातीचे गणपती आदी अनेक गोष्टी मुले तयार करतात.वार्षिक दुकान यात्रेत या वस्तूंची विक्री मुले स्वतः करतात.वस्तूंच्या किंमती ठरविण्यापासून ते विक्रीचा हिशेब ठेवण्यापर्यंतच्या सर्व सोपविलेल्या जबाबदा-या वयानुसार मुले पार पडतात.आजच्या काळात व्यवहारज्ञानही फार महत्वाचे असल्यामुळे चौथी-पाचवीच्या मुलांना वेगवेगळ्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष अनुभवासाठी पाठवावे.त्यातून व्यवहारज्ञान तर मिळेलच पण माणसांशी संवाद साधण्याची कलाही ते आत्मसात करू शकतील.जगाच्या ओळखीबरोबरच सामाजिक विकासही महत्वाचा असल्यामुळे ‘ब्लड बँकेला’भेट,आठवडी बाजाराला भेट,घंटागाडी,कामगारांची मुलाखत,तसेच अंधशाळा,कर्णबधीर आणि बहुविकलांग शाळेला भेट आदी उपक्रमात मुलांना सामावून घेतले जावे.वेगवेगळे कलाकार,उद्योजक,विषयतज्ज्ञ अशा अनेक मान्यवरांना शाळेत बोलावले जावे.ते मुलांबरोबर गप्पा मारतील.एकूण मुलांना श्रवणभक्तीची सवय न लावता कृतीशील बनण्यासाठी प्रयत्न केला जावा.विद्यार्थ्यांची सृजनशीलता आनंददायी शिक्षणातून अनुभवता यावी.
परीक्षा व मूल्यमापन-
प्रत्येकाकडे उपजत बुद्धी,आवड,क्षमता व कौशल्य असले तरी त्याला त्याची जाणीव होणे महत्वाचे असते.त्यासाठी मूल्यमापनाची पद्धती निश्चितच महत्वाची ठरते.परीक्षेचा रूढ अर्थ रचनावादाला मान्य नाही,तर पाठांतरापेक्षा आकलनावर,मुलांच्या ग्रहणशक्तीवर,त्यांची विचार करण्याची क्षमता,उपयोजन यावर आधारित प्रश्न असावेत.मुलांना स्वतःची मते व्यक्त करता येतील अशा प्रश्नांचा मुद्दाम समावेश करावा.मूल्यमापनात विद्यार्थ्याला काय लिहिता आले यापेक्षा वैयक्तिक पातळीवर तो आज कुठे आहे ? पूर्वीपेक्षा त्याने कोणत्या गोष्टीत किती प्रगती केली ? हे समजणे महत्वाचे असते.मूल्यमापनाचा संदर्भ विषयांप्रमाणेच वागणुकीशीसुद्धा असतो.गुणांमुळे स्पर्धा निर्माण होत असल्यामुळे,जोपर्यंत मुलांना मिळालेल्या किंवा गेलेल्या गुणांचा अर्थ कळत नाही.तोपर्यंत मुलांना गुण किंवा श्रेणी देवू नये.प्रत्येक गोष्टीची विस्तृत शाब्दिक नोंद करावी.नुसत्या पदव्या आणि गुणांचे ढीग जमवून क्षमतांची जाणीव होत नाही.त्यासाठी उद्यमशीलता,शोधकवृत्ती आणि आत्मविश्वास हवा असतो.तो ज्ञानरचनावादी मूल्यमापनातून मिळायला हवा.म्हणून फक्त ‘घोका आणि ओका’ ही पारंपारिक पद्धत बंदच व्हायला हवी.
औपचारिक शिक्षणात ज्ञानरचनावादाचे स्थान-
शिक्षणातील वास्तव आणि ज्ञानसंरचनावादी अध्ययनाचे स्वरूप लक्षात घेता काही जणांना ते केवळ अवघडच नव्हे तर अशक्यही वाटते.तरी ज्ञानरचनावादीतत्वज्ञानानुसार चालना-या औपचारिक अध्ययनात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ज्ञानसंरचनावादानुसार ज्ञाननिर्मितीसाठी –
- विद्यार्थ्यांसमोरची समस्या (अभ्यासक्रमातील घटक निश्चिती )त्यांना जाणवायला हवी.
- ती सोडविण्याची अंतःप्रेरणा (संप्रेरण )त्यांना असायला हवी.
- समस्या समजावून घेणे,तिच्यावर उपाय शोधण्यासाठी पुर्वानुभावाचा आधार घेणे अथवा प्राप्त परिस्थितीचा सर्वांगाने विचार करून तर्काच्या मदतीने अनुमान काढणे.(अध्यायानानुभव निश्चिती व अंमलबजावणी )आणि
- त्याची प्रत्यक्षातील चाचणी घेऊन (मूल्यमापन ) मगच त्या उपायाचा स्वीकार करणे हे सारे मुलांकडून व्हायला हवे.पण औपचारिक शिक्षणात मात्र याउलट सारे घडताना दिसते.
- मुलांनी काय शिकायचे (अभ्यासक्रम ) हे शिक्षण व्यवस्था ठरवते,
- त्यांना शिकण्यासाठी कसे तयार करायचे (संप्रेषण )कोणत्या पद्धतीने शिकवावयाचे (अध्ययनानुभव )आणि,विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल झाले आहेत की नाही याची परीक्षा घेऊन (मूल्यमापन )निकाल जाहीर करायचे हे शिक्षक अथवा परीक्षा मंडळ ठरवितात.
अशा परिस्थितीत औपचारिक शिक्षणात ज्ञानसंरचनावादाला प्रवेश कसा मिळणार ?अशी शंका व्यक्त केली जाते.दुसरी शंका विद्यार्थी संख्येबाबत विचारली जाते.कारण काही वर्गात ५०-६० च्या पुढे मुले असतात.शंका रास्त असल्या तरी हे लक्षात ठेवायला हवे की यापुढीलकाळातआपल्या देशाला औपचारिक शिक्षणात ज्ञानसंरचनावादाचा अवलंब केल्याशिवाय चालणारच नाही.याची तीन महत्वाची कारणे आहेत.
१)पहिले कारण असे की,मुलांना शिक्षणात मध्यवर्ती स्थान देण्याचा आग्रह १९ व्या शतकाच्या अखेरीपासून धरला गेला होता,परंतु २० व्या च्या पूर्वार्धाच्या अखेरपर्यत त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते, ज्ञानसंरचनावादामुळे ती शक्यता निर्माण झाली आहे.सध्यातरी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा तेवढा एकाच मार्ग दिसत असताना त्याकडे दूर्लक्ष करता येणार नाही.
२)दुसरे कारण म्हणजे समस्याग्रस्त आणि स्पर्धात्मक जगामध्ये जगण्यासाठी आवश्यक ठरणारे विचार प्रक्रियेतील बदल,तसेच बौद्धिक आणि सामाजिक कौशल्ये ज्ञानसंरचनावादी अध्ययनाने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यची शक्यता आहे.जगातील समाजाची सध्य:स्थिती लक्षात घेता उद्याच्या जगात भारत हा सर्वात जास्त तरुण मनुष्यबळ असलेला देश ठरणार आहे.हे तरुण केवळ दुसऱ्या देशातील लोकांना सेवा पुरविणारे ( service provider ) ‘सांगकामे’ठरायला नको असतील तर त्याचे शिक्षण ज्ञानसंरचनावादी विचारसरणीनुसार होणे हाच सर्वात उत्तम मार्ग ठरतो.
३)तिसरे व वस्तुस्थितीवर आधारलेले आधारलेले महत्वाचे कारण म्हणजे औपचारिक शिक्षणातही ज्ञानसंरचनावादी अध्ययन घडू शकते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.मोठ्या संख्येसाठी विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्याकडे लक्ष दिले गेले होते,त्यामुळे याबाबतही उपाय सापडला आहे.
तेव्हा शिक्षणात ज्ञानसंरचनावादाला केवळ स्थान आहे एवढेच नव्हे,त्याचा आधार घेणे अत्यावश्यक ठरलेले आहे.त्यासाठी शाळांना,मुख्याध्यापकांना व शिक्षकांना काही पूर्वतयारी करावी लागणार आहे.काही नवी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत, आणि मुख्य म्हणजे त्यासाठी सकारात्मक वृत्ती अंगी बनवावी लागणार आहे.
विचार करा—
“If one seriously adopts the constructivist approach,one discovers that many more of one’s habitual ways for thinking have to be changed. —- Von Glasersfeld
…………………………………………………………………………………………………………………………………………………….
संदर्भ-
१)ज्ञानाचा रचयिता-माझा मीच ……..सुमन करंदीकर ,अनिता पटवर्धन
२)रचनावादी शिक्षण …… प्रा.रमेश पानसे
३)ज्ञानरचनावाद विशेषांक ऑक्टो.२०१०-डिसें.२०१०
४)शिक्षण संक्रमणज्ञानरचनावाद विशेषांक मार्च-२०१०
५)Brunner J.S. (1996 )- The culture of education
…………………………………………………………………………………………………………………………………………………
श्री.उमाकांत जगताप –प्रा.डॉ.एन.डी.पाटील विद्यालय,सह्याद्रिनगर,कांदिवली(प.)मुंबई-६७
-संपर्क-९००४०४६९९७ ,८६९१०५४३३८