सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

महाराष्ट्राच्या कडेकपा-यांना लिहितं-वाचतं करणारा एक महान कर्मयोगी “कर्मवीर भाऊराव पाटील”

रयत शिक्षण संस्थेचे,

महाराष्ट्राच्या कडेकपा-यांना लिहितं-वाचतं करणारा एक महान कर्मयोगी “कर्मवीर भाऊराव पाटील”

कर्मवीर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपा–यांना लिहितं-वाचतं केले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत,तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरावांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.प्रत्येक गावात एखादे देऊळ असे असते की,ज्याचे शिखर कित्तेक कोसावरून दिसते.महाराष्ट्राच्या लोकजीवनात अशी शिखरे सोन्याच्या कळसाने सजलेली आपल्याला जगाच्या पाठीवरून कोठूनही दिसतील,त्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हे एक सोन्याच्या कळसाचे उत्तुंग शिखर आहे.या देवळातील देवता आहे विद्यादेवी.या देवळाचा गाभारा आहे भाऊरावांच्या हृदयाचा.भाऊराव गेले पण हा गाभारा सरस्वतीच्या मंगल स्त्रोत्रांनी आणि मंत्रांनी घुमत आहे.तो चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत घुमतच राहणार आहे.” या शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेला कर्मवीरांचा गौरव बरेच काही सांगून जातो.

      महाराष्ट्राच्या कुशीत आणि मुशीत अस काही लोकोत्तर व्यक्तिमत्व होऊन गेले की ज्यांनी आपल्या विचारांनी महाराष्ट्राच्या समाजजीवनावर ठसठशीत ठसा उमटवला.कर्मवीर हे मुळात “सत्यशोधक”चळवळीचे कार्यकर्ते.जातीपातीच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ ही ‘जात’आणि त्याचा धर्म ‘माणुसकी’ एवढ साधं सूत्र मांडणारा व आयुष्यभर ते प्राणपणाने जपणारा एक असामान्य ‘लोकनायक’.

      स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे.जाती-पाती,भेदभाव परमोच्च शिखरावर होता.कर्मवीरांनी १९२४ ला साता-यात अठरापगड जातीच्या मुलांसाठी एकच वसतिगृह सुरु केले.त्याचे नाव ‘शाहू बोर्डिंग’.सर्व जातीधर्माची मुले एका छताखाली मांडीला मांडी लावून जेवू घातली.समाजातील जातिभेदाचा एकही ओरखडा त्यांनी वसतिगृहात उमटू दिला नाही.हे कार्य एवढे महान होते की कोणालाही हेवा वाटेल.याचे कारण सन १९२४ नंतर तब्बल तीन वर्षांनी सन १९२७ ला महाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित बांधवांसह ‘चवदार तळ्यावर’जाऊन ओंजळभर पाणी उचललं म्हणून तत्कालीन सवर्ण समाजाने त्यांना मारहाण केली होती.यावरून कर्मवीरांचे कार्य हे लोकमान्य,राजमान्य आणि सामाजमान्यही होते हे सिद्ध होते.

            महात्मा फुल्यांनी १८४८ साली पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरु करून शिक्षणाची ज्योत पेटविली असली तरी त्यावर कळस चढविण्याचे कार्य कर्मवीरांनी केले.महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण महाविद्यालय कर्मवीरांनी सुरु केले.सन १९३७-३८ साली मुंबईराज्यात पहिले कॉग्रेस मंत्रिमंडळ सत्तेवर आले.त्यात भाऊरावांचे एकेकाळचे गुरु अण्णासाहेब लठ्ठे हे अर्थमंत्री होते.त्यांना भाऊराव भेटले आणि म्हणाले,”बहुजन समाजातल्या मुलांना गतीने शिक्षण मिळेल असे आपण काहीतरी केले पाहिजे.”त्यावर लठ्ठे म्हणाले,”तुम्ही एखादी योजना तयार करून आणा म्हणजे त्यावर विचार करता येईल.”भाऊरावांनी विठ्ठलराव घाटे यांना गाठले.ते तेव्हा शिक्षण खात्याचे उपसंचालक होते.ते कर्मवीरांचे चाहते होते.दोघांनी मिळून ‘व्हालंटरी प्रायमरी स्कूल्स’ची योजना तयार केली.म्हणजे सरकारच्या ज्या गावी शाळा नाहीत;तिथे प्राथमिक शाळा उभारायच्या.पात्र असा शिक्षक नेमावयाचा आणि शाळेसाठी येणारा सगळा खर्च सरकारने द्यायचा मात्र प्रशासन व व्यवस्थापन खाजगी संस्थेने करायचे.भाऊरावांनी डोंगराळ,दुर्गम,अडचणीच्या आणि दुष्काळी खेड्यात जिथे सरकार शाळा काढत नाही तिथे शाळा उघडायचे ठरवले व त्यांनी शाळा सुरु केल्या. सन १९४९-५० पर्यंत या शाळांची संख्या ५७८ इतकी झाली होती.आणि काम करणा-या शिक्षकांची संख्या १२०० पेक्षा अधिक होती.शासनानेही या शाळांचा गौरव केला होता.’रयत शिक्षण संस्थेने’केलेल्या कार्याचे मोल महाराष्ट्राला विसरता येईल का ?

      उद्या कदाचित विसाव्या शतकाचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा भाऊराव पाटील हे नाव वगळून तो पूर्ण होऊ शकणार नाही हे मात्र निश्चित.शिक्षणाची पताका अण्णांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.ती निष्ठेने वागविली.त्यासाठी गावोगाव ज्ञानमंदिरे उभारली.तेथे आपल्याप्रमाणेच वाहून घेणा-या,समर्पित बुद्धीने काम करणा-या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.स्वतःच्या संसाराकडे पाठ फिरवून समाजाचा संसार करणारी त्यागी माणसे तयार केली.त्यातही सामान्य स्तरातील आणि बहुजन समाजातील माणसे घडविणे खरेच अवघड.त्यांना त्याग करावयास लावणे,सेवेसाठी खेचणे,त्यांच्या औदार्याला हात घालून देणगी जमविणे,ही सर्वात अवघड गोष्ट म्हणावी लागेल.अण्णांनी मात्र ती लीलया केली.दिव्याने दिवा पेटवावा तसा प्रकार घडला.त्यांनी श्रीमंतांची मदत घेतली.गरिबांची मदत घेतली.संस्थानिकांची मदत घेतली.शेतमजुरांची घेतली.त्यांनी व्यापा-यांना कार्याला जुंपले.राजकारण्यांना यासाठी वेळ द्यायला लावले.शिंदे,होळकर,गायकवाड,पवार,भोसले,निंबाळकर यासारख्या संस्थानिकांच्या देणग्या घेतल्या.लहान-मोठ्या अशा शेकडो व्यक्तींकडून त्यांनी दान घेतले.ते सत्कारणी दिल्याचे सिद्ध करून दाखविले.पण त्यापेक्षाही संस्थेसाठी आपले आयुष्य देणारी व सेवाभावी आणि त्यागी वृत्तीने काम करणारी हजारो माणसे तयार केली.ही खरी मोलाची गोष्ट म्हणावी लागेल.या सर्वांच्या सहकार्यामुळेच मोहरी एवढ्या असलेल्या वटवृक्षाच्या बीजाचा महान वटवृक्ष तयार झाला.सर्वांना आधार देऊ शकला.सावली देऊ शकला.

अण्णांच्या अखेरच्या क्षणी एकदा प्रा.एन.डी.पाटील आणि ब.पी.जी.पाटील कर्मवीरांना भेटावयास गेले तेंव्हा अण्णांच्या बोलण्यात संस्थेचा विषय आला.ते या दोघांना म्हणाले, “काही झाले तरी माझी ही संस्था टिकली पाहिजे.संस्था ही एक ऐतिहासिक गरज आहे.ज्याक्षणी ही गरज संपेल त्याक्षणी माझी संस्थाही नष्ट होईल.तुम्ही कार्यकर्त्यांनी या वटवृक्षाखाली खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.त्याप्रमाणे सर्वच कार्यकर्ते संस्थेसाठी पाय रोवून उभे ठाकले म्हणून संस्थेचा एवढा अवाढव्य विस्तार झाला.संख्यात्मक व गुणात्मक वाढ झाली.

      २२ सप्टेंबर कर्मवीरांच्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !

जय भारत

श्री.उमाकांत जगताप
रयतसेवक,
-९००४०४६९९७ /८६९१०५४३३८