सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

मुख्याध्यापक मनोगत,

रयत शिक्षण संस्थेचे,

श्री.गावित दादा चिंतामण

आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाचे कार्य महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांत व कर्नाटकातील एका तालुक्यात अशा ६७५ शाखांमध्ये सुरु आहे.कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाची गंगा बहुजनांच्या झोपडीपर्यंत नेली .’कमवा व शिका’ ही योजना व वसतिगृहांच्या माध्यमातून आधी पोटाची खळगी भरण्याची सोय करून मग त्यांच्या ज्ञानाची भूक भागवण्याची व्यवस्था अण्णांनी रयतच्या माध्यमातून केली.राज्याच्या राजधानीत एक तरी रयतची शाळा असावी ,असे अण्णांचे स्वप्न होते.अण्णांच्या पश्चात संस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रा.डॉ.एन.डी.पाटील सरांनी सह्याद्रीनगर या माथाडी कामगारांच्या वस्तीत तेथील कामगार व हितचिंतक यांच्या सहकार्याने जुलै १९९२ मध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल,सह्याद्रीनगर ‘या नावाने शाळेची स्थापना केली .शिशु वर्ग ते चौथी आणि पाचवी व आठवी अशी सुरुवात झालेल्या या शाळेत आज शिशु वर्ग ते दहावीपर्यंतचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु आहेत.

१७ जून २०१३ रोजी शाळेने नव्या टुमदार व सुंदर वास्तूत प्रवेश केला.तसेच विद्यालयाचे नामकरण ‘प्रा.डॉ..एन.डी.पाटील विद्यालय’ असे झाले.सदर सोहळ्यास स्वतः प्रा.डॉ.एन.डी.सर यांच्यासह तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार,मा.पतंगराव कदम,मा.शशिकांत शिंदे,संस्था पदाधिकारी व स्थानिक आमदार योगेश सागर उपस्थित होते. स्वच्छ व सुंदर इमारत ,प्रशस्त मैदान,पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था,सी.सी.टी.व्ही.कॅमेरे,ज्ञानसमृद्ध ग्रंथालय,सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा ,गणित प्रयोगशाळा ,अद्ययावत संगणक कक्ष या भौतिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या विद्यालयात डिजिटल प्रणालीचा देखील अध्यापनात उपयोग केला जात आहे.स्पर्धा परीक्षेचे महत्त्व जाणून येथे कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र परीक्षा ,रयत प्रज्ञाशोध परीक्षा,रयत ऑलिम्पियाड परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा ,शासकीय चित्रकला परीक्षा ,गांधी विचार संस्कार परीक्षा ,होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा यांसारख्या बाह्य परीक्षांना विद्यार्थ्यांना प्रविष्ठ केले जाते.निबंध स्पर्धा,वक्तृत्त्व स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा,टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्मिती ,विज्ञान खेळणी निर्मिती ,क्रीडा स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम,क्षेत्रभेटी ,विज्ञान प्रदर्शन,दैनंदिन इंग्रजी परिपाठ,स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट,वाढदिवस अभिष्टचिंतन,आर.एस.पी. यासारखे उपक्रम येथे वर्षभर घेतले जातात.

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यालयात रयत मिनी गुरुकुल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात करण्यात आली आहे.ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जादा वेळेत विनामोबदला मार्गदर्शन केले जाते.तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांच्या भाषणांच्या ध्वनिचित्रफिती,तज्ज्ञांची व्याख्याने,स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट ,अवांतर वाचन व सारांश लेखन ,सूक्ष्म गुणविश्लेषण व वैयक्तिक मार्गदर्शन या उपक्रमांचा समावेश होतो. जे विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत आहेत त्यांच्यासाठी उपचारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनाही इतर विद्यार्थ्यांसोबत आणले जाते.लेझीम या पारंपारिक खेळाचेही मार्गदर्शन केले जात आहे.बोलक्या भिंती प्रकल्पाच्या माध्यमातून ज्ञानरचनावाद साकारला जात आहे.

विद्यालयाच्या गुणवत्तेचा दर्जाही दिवसेंदिवस उंचावत आहे.येथील विद्यार्थी विविध पातळ्यांवरील स्पर्धा व परीक्षांमध्ये आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवीत आहेत.अजय संजय लोकरे याने होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत रौप्य पदक मिळविले आहे तर संस्कार सुनील पुरस्कार याची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १२ वर्षाखालील संघात निवड झाली आहे.रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा आदर्श शाळेसाठीचा ‘ कर्मवीर पारितोषिक’ शाळेने २००९-१० या पहिल्याच वर्षी प्राप्त केला आहे तर सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षाचा संस्थेचा ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ विद्यालयातील विद्यार्थी कुमार अजय संजय लोकरे याला मिळाला आहे.येथील शिक्षकही विविध क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत.विद्यालयातील उपशिक्षक श्री.प्रबळकर एन.एस.यांनी २०१६-१७ चा ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्राथमिक विभागानेदेखील बांद्रा ते दहिसर पर्यतची सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून पारितोषिक मिळविले आहे तर प्राथमिक विभागाचे उपशिक्षक श्री उमाकांत जगताप यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने महापौर पुरस्काराने गौरविले आहे.एकुणात मराठी माध्यमाची माझी शाळा काळाची आव्हाने पेलण्यास सिद्ध आहे.