आता नको आय.ए.एस.सेवा , हवी आहे आय.डी.एस.सेवा’ I.A.S.- INDIAN ADMINISTRATIVE SERVICES I.D.S.-INDIAN DEVELOPMENT SERVISES
आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षे होत आहेत.या सत्तर वर्षात भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी झाली आहे.अजूनही निरक्षरता आहे,कुपोषण आहे,प्राथमिक शिक्षणाची आबाळ आहे तसेच आरोग्य सेवा नाही, जी आहे ती गैरसोईची आहे.अन्न,वस्त्र,निवारा या सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे.त्यातच जगण्यासाठी रोजगाराची सुविधा सुद्धा खूपच कमी आहेत,अशा परिस्थितीत भारत विकासाकडे वाटचाल कशी करणार ?याचा विचार सर्वांनी करणे आवश्यक आहे.राज्यकर्ते देशाच्या विकासाच्या योजना आखतात त्यावर निर्णय घेतात मात्र कार्यवाही करण्याची जबाबदारी आपल्या नोकरशहांची असते,म्हणजेच आय.ए.एस.अधिकाऱ्यांची असते.ते ती योग्य प्रकारे पार पडतात का ?हे पहाणे महत्वाचे आहे.
ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केले.त्यांनी राज्य करण्यासाठी दमनशाहीचा उपयोग केला.त्यांच्या आय.ए.एस.परीक्षा पास झालेल्या अधिका-यांना त्यांनी प्रशासनाची जबाबदारी दिली.त्यांनी या देशाच्या विकासाचा विचार केला नाही.फक्त रेल्वे आणि पोस्ट-तारखाते या दोन सुविधा निर्माण केल्या पण त्याही त्यांचा राज्यकारभार चालविण्यासाठी ,भारताचा विकासासाठी नाही हे लक्षात ठेवायला हवे.त्यांच्या शिक्षणात तोडा आणि फोडा यावर जास्त भर देण्यात आला होता.याचा आपण विचार केला पाहिजे.त्यांच्या आय.सी.एस.परीक्षेत विकासाचा विचार नव्हता हेही लक्षात घेतले पाहिजे.इंग्रजांच्या तावडीतून आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी मोठा संग्राम करावा लागला.अनेक तरुणांना फासावर जावे लागले.अनेक जण तुरुंगात गेले.अनेकांना गोळीबार सहन करावा लागला.खासकरून लो.टिळक,म.गांधी ,सुभाषचंद्र बोस या स्वातंत्र्यवीरांनी जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांबरोबर संघर्ष केला,तुरुंगवास भोगला.पण हेच स्वातंत्र्यवीर त्यावेळी सुद्धा सांगत होते.आपला भारत देश स्वतंत्र होणार ब्रिटिशांना जावे लागणार पण स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आपला भारत देश कसा घडवायचा याचा विचार तरुणांनी करणे महत्वाचे आहे ,देशाचे भवितव्य त्यांच्याच हातात आहे
आपला देश स्वतंत्र झाला आपला देश कसा घडवायचा याचा विचार त्यावेळचे राज्यकर्ते करीत होते.पण सुरुवातीच्या काळात इंग्रजांचेच कायदे वापरायला सुरुवात झाली.काही वर्षे आय.सी.एस. परीक्षा पास झालेल्यांनाच मुख्य-सचिव,सचिव,आयुक्त,कलेक्टर पदावर नियुक्त करावे लागले.त्यानंतर आपल्या देशाने प्रशासन चांगले चालावे म्हणून आय.ए.एस.परीक्षा आणली.ती पास झाल्यावर त्या-त्या पदावर आय.ए.एस.पास झालेल्यांना नियुक्त करण्यात आले.पण विकास झाला का ? असा प्रश्न आज उभा राहतो.आपला भारत देश आता विकसन देशाबरोबर वाटचाल करीत आहे पण आपले नोकरशहा याचा विचार करतात का ? हा प्रश्न आज भेडसावत आहे.आपल्या देशाने विकासाचे अनेक प्रकल्प सुरु केले.ते चांगल्या प्रकारे चालावेत म्हणून प्रयत्न केले पण आपल्या आय.ए.एस.अधिकाऱ्यांनी आपल्या मनाचा विकास केलेला नाही.असा अनुभव सतत येत राहतो.त्यांच्या अभ्यासक्रमात प्रशासन हाकणे हेच असते तेथे त्यांना इतर विचार करता येत नाही.हे त्यांचे म्हणणे योग्य नाही तर त्यांच्या अभ्यासक्रमात विकासावर जास्त भर देणे आवश्यक आहे.कारण आता माहिती तंत्रज्ञान युगाकडे वाटचाल करावी लागत आहे.कॉम्पुटर युग आहे.या युगाला सामोरे जाण्यासाठी अर्ज विनंत्याची जरुरी नाही, आहे ती तंत्रज्ञानाची .ते तंत्रज्ञान आपल्या नोकरशहांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.जर विकासाचे नावे तंत्रज्ञान आत्मसात केले नाही आय.ए.एस.परीक्षा कालबाह्य ठरेल हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
आपल्या भारताचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ,जाणकार डॉ.होमी भाभा यांना ज्यावेळी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी अणुउर्जा विकासासाठी चर्चेला आमंत्रित केले तेव्हा सुप्रसिद्ध उद्योगपती भारतरत्न जे.आर.डी.टाटा डॉ.भाभाना नेहरूंकडे घेऊन गेले तेव्हा चर्चेवेळी पंडित नेहरूंनी डॉ.भाभांना विनंती केली .. “भारतात अणुशक्ती निर्माण करण्यासाठी आपण यावे” त्यावेळी भाभांनी नेहरूंची विनंती मान्य केली पण काही अटी त्यांनी नेहरूंना घातल्या.त्यामध्ये अणुशक्ती या विषयाचे खाते निर्माण करू नका फक्त आयोग स्थापन करा.त्या आयोगामध्ये आपला एकही आय.ए.एस.अधिकारी असू नये.सर्वजण शास्त्रज्ञच असतील अशी व्यवस्था करा.नेहरूंनी भाभांची सूचना तात्काळ मान्य केली.त्यानंतर भारतात अणुशक्ती आयोग निर्माण करण्यात आला.आतापर्यंत साऱ्या जगात आपल्या अणुशक्ती आयोगाने (B.A.R.C.) चांगल्या प्रकारे कार्य केले आहे.आजही करीत आहे हे विशेष आहे.प्रशासनात ज्या ज्या ठिकाणी त्या विषयाचे जाणकार तसेच तज्ञ असतात त्या त्या ठिकाणी कामकाज चांगले चालते व देश विकासाकडे वाटचाल करीत राहतो.
आज आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातायत पण आय.ए.एस.दर्जाच्या सेवकांची इच्छाशक्ती फार कमी पडते आहे.खरे पाहता या आय.ए.एस. सेवकांना सर्व प्रकारच्या सुखसोई दिल्या जातात,वेतन-भत्ते चांगले आहेत पण विकास कामाबाबत विचारल्यास ते कमी पडतात.सामाजिक जाणीव आणि मन लावून काम करण्याची ज्या सेवकाची इच्छाशक्ती असते,त्यांचे काम चांगले होते.पण याचा विचार करणार कोण ?
महाराष्ट्राचा औद्योगिक विकास करण्यासाठी राज्य पातळीवर अनेक महामंडळे आहेत.(उदा.एस.टी.,वीज मंडळ,सिकॉम ,एम.आय.डी.सी.,इत्यादी )त्यांच्या प्रमुखपदी आय.ए.एस. सेवकाच आहेत.मध्यंतरी या मंडळांच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली श्रीयुत शरद उपासनी यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात आली.या समितीचा अहवाल चांगला आला नाही.विकासाच्या संदर्भात आय.ए.एस. सेवकांना खास प्रशिक्षण देण्याची गरज आहे असे अहवालात सूचित करण्यात आले.मात्र हा अहवाल लोकांसमोर आला नाही याचे दुःख होते.भारत सरकारने मात्र विकास करणाऱ्या सर्व महामंडळाच्या प्रमुखपदी त्या त्या विषयाचे जाणकार नियुक्त केले आहेत.उदा.ऑईल कार्पोरेशन,बँका,एल.आय.सी.ऑफ इंडिया ,शिपींग कार्पोरेशन ,विमान व्यवस्था इत्यादी.या महामंडळाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे होत आहे.याचा विचार करणे महत्वाचे आहे.फक्त आय.ए.एस. आहेत तेच फक्त सर्वज्ञ आहेत असे कोणी समजू नये.
तरीसुद्धा महाराष्ट्रात गेली ३० ते ३५ वर्षे विकासाच्या प्रश्नावर अनेक सचिव,आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. पण काही सन्माननीय सकारात्मक विचार करणारे अपवाद सोडता बहुतांश नकारात्मक मानसिकता असणारेच अधिक आढळले.आज ते सेवेत आहेत किंवा नाहीत ते पाहावे लागेल.पण काही आय.ए.एस. सेवकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की जे विकासासाठी झटणारे व तशाप्रकारचे कामकाज करणाऱ्या संस्थांना सहकार्य करणारे सेवक होते आणि आहेत. उदा.सदाशिवराव तिनईकर ,मा.द.म.सुखतनकर,मा.अरुण भाटीया,मा.अशोक सिन्हा ,मा.सुब्रमण्यम,सौ.मनिषा पाटणकर-म्हैसकर इत्यादी
आज भारताला विकासाकडे वाटचाल करायची आहे.त्यासाठी प्रशासन विकासाच्या मानसिकतेचा विचार करणारे असणे महत्वाचे आहे.आय.इ.एस. सेवेपेक्षा आय.डी.एस. सेवा निर्माण करणे आवश्यक आहे.त्यासाठी विकासाच्या विषयावर भर नेणे महत्वाचे आहे नाहीतर “सरकारी काम आणि सहा महिने थांब”असे लोकांना म्हणण्याची वेळ आली आहे.ती वेळ न येत “सरकारी काम झटकन झाले” असे म्हणण्याची वेळ येईल तो विकासाचा ‘सुवर्णदिन’होईल.हे सर्वांना समजून येईल.